समाजसेवा हा एकच ध्यास उराशी बाळगून सारंग काकांनी घेतला अखेरचा श्वास
रजनीकांत सुहास साळवी
प्रभादेवी, ता. 31:- आपला देह अखंडपणे सामाजिक कार्यासाठी खर्ची घालून निधनानंतरही अंतिम संस्कार न करता स्वतःचे देहदान करून प्रभादेवीतील सामाजिक कार्यकर्ते सुभाष सारंग यांनी सामाजिक बांधिलकी जपली.
प्रभादेवी येथील दानशूर उद्योजक सामाजिक कार्यकर्ते सारंग वडापावचे सर्व्हे सर्व्हा सुभाष सारंग यांचे बुधवारी दीर्घ आजाराने त्यांच्या राहत्या निवासस्थानी निधब झाले ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा मोठा परिवार आहे.
बुधवारी प्रभादेवी येथे त्यांचा देह अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी सर्व राजकीय पक्षातील नेते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच त्यांच्यावर प्रेम करणारे परिसरातील मित्र मंडळींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले त्यानंतर त्यांचा देह नायर रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आला.
निधनानंतर आपला देह शिकाऊ डॉक्टरांच्या उपयोगी पडावा अशी त्यांची इच्छा होती त्यानुसार त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा देह नायर मेडिकल सायन्स सेंटर कडे सुपूर्द केला.
गिरणी कामगार ते उद्योजक असा खडतर प्रवास करत हालाखीच्या परिस्थितीतही कष्टाच्या जोरावर प्रभादेवीत वडापावचा उद्योग मोठा करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आज लोक सारंग वडापाव असा लॅन्ड मार्क मार्क इतरांना सांगतात.
सारंग काका वडापाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुभाष सारंग यांनी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत निस्सीम प्रेम केले त्यांना लळा लावला अनेक तरुणांना नोकरीं नाही तर उद्योजक बना असे बीज त्यांच्या मनात पेरले.
लहान मुले त्यांना अधिक प्रिय होती वेळ मिळेल तेव्हा तो त्यांच्यात जाऊन लहान होऊन खेळायचा त्यांना पिकनिकला घेऊन जायचा. लहान असो वा मोठा त्यांना स्टॅचू करणे हा त्याचा आवडीचा खेळ होता. तर आजार विसरून दहीहंडीत हंडी फोडण्याची संधी तो कधीच वाया घालवत नव्हता.
दुर्धर आजाराने ग्रासलेला असताना देखील स्वतःचे दुखणे, वेदना विसरून तो इतर पीडिताना धीर द्यायचा त्याच्या धीरामुळे अनेकांना बरे वाटायचे.
अनेक मंडळावर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले अनेक ठिकाणी कार्यक्रमात जाऊन त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ते अध्यक्ष पद भूषवीत असताना त्यांनी संपूर्ण प्रभादेवीतील माहेरवासिनीना एकत्र एका छताखाली आणले.
प्रत्येक सुख दुःखात ते सहभागी होत असे.
त्यांनी अनेकांना रोजगार निर्माण करून दिला. गरिबांना मोफत अन्न मिळावे यासाठी त्यांनी एक हात मदतीचा यानुसार फ्रिज संकल्पना देखील राबविली.
पालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदतीचा हात दिला. विभागातील गरजू व्यक्तींच्या कायम पाठीशी उभे राहिले. असा दानशूर व्यक्ती हरपल्याने विभागात हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे.
