आजोबांनी जोपासला शाहिरी कलेचा वारसा

Share

रजनीकांत सुहास साळवी

९७ वर्षीय आजोबांच्या शाहीरी गाण्याने उपस्थितही भारावले

प्रभादेवी : शाहीरी कलेची आवड आणि परंपरा जपत वयाच्या तब्बल ९७ व्या वर्षीही आपल्या जोशपूर्ण आवाजाने गाणे सादर करणाऱ्या आजोबांनी उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्यांच्या दमदार आवाजातील शाहीरी गाण्याने उपस्थितही भारावून गेले.

मुंबईतील जय हनुमान सेवा मंडळाच्या वतीने वारेली या खेडेगावात आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमात चिपळूण तालुक्यातील वारेली गावातील ९७ वर्षीय शाहीर पांडुरंग कदम या आजोबांनी आपल्या आयुष्यभर जोपासलेल्या शाहीरी कलेची झलक दाखवली.

वयाची नव्वदी ओलांडल्यानंतरही त्यांची ऊर्जा, शब्दांवरील पकड आणि ताल-लय यांचे अचूक भान पाहून उपस्थितांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. गाणे सादर करताना त्यांनी पारंपरिक शाहीरी शैलीत समाजप्रबोधनाचा संदेश देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

माझी मैना गावाकडे राहिली या त्यांच्या गाण्याच्या सादरीकरणानंतर उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा गौरव केला. अनेकांनी त्यांच्या जिद्दीचे आणि कलेप्रती असलेल्या निष्ठेचे कौतुक केले. आजच्या तरुण पिढीनेही अशा ज्येष्ठ कलाकारांकडून प्रेरणा घेऊन लोककला जपण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

तरुणपणी त्यांच्या या शाहीरी गाण्याच्या सादरीकरणवर ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती.

या कार्यक्रमामुळे शाहीरीसारख्या पारंपरिक लोककलेचे जतन आणि संवर्धन करण्याची प्रेरणा मिळाली असून, ९७ वर्षीय आजोबांच्या या अविस्मरणीय सादरीकरणमुळे इतरांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली असल्याचे उपस्थित रसिकानी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *