आर्यन्स गोविंदा पथकाने स्पॅनिश स्टाईलने रचले थरांवर थ रजनीकांत साळवी
प्रभादेवी, ता. 19 :- दहीहंडीला खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच प्रभादेवी येथे घेण्यात आलेल्या गोविंदा स्पर्धेत स्पेन मधील मानवी मनोऱ्यांच्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत जोगेश्वरी येथील आर्यन्स गोविंदा पथकाने फोरडी सिक्स पद्धतीने सहा थर रचत प्रत्यक्षिके सादर केली.
शिडीचा वापर न करता स्पॅनिश स्टाईलने शिस्तबद्ध पद्धतीने अवघ्या काही सेकंदात उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवत आर्यन्स गोविंदा पथकाने फोरडी सिक्स थर रचत सर्वांची मने जिंकली.
खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर मातीतल्या कबड्डी खेळा नंतर आता दही हंडी खेळाचे वारे देखील वाहू लागले असून प्रभादेवीत खेळ महोत्सव अंतर्गत भरविण्यात आलेली गोविंदा स्पर्धेतील थरार अनुभवण्यासाठी परिसरातील स्थानिकांनी गर्दी केली होती.
खासदार अनिल देसाई यांच्या संकल्पनेतून प्रभादेवी येथे चवन्नीगल्ली मैदानात आयोजित करण्यात आलेल्या गोविंदा स्पर्धेला मुलांचे 16 तर मुलींचे 6 गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता.
यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या गोविंदा पथकांनी एका मिनिटाच्या आत शिस्त बद्ध पद्धतीने चार व पाच थर लावत सलामी देत पुन्हा त्याच पद्धतीने खाली उतरून आपला परफॉर्मन्स सादर केला.
स्पर्धेतील विजेत्या गोविंदा पथकाना पुरुष गटात अनुक्रमे 25, 20, 15 व 10 हजार रुपये तर महिला गटात 20,15,10 व 5 हजार रुपये पारितोषिक देण्यात आली.
गोविंदाचे बीज सर्व जिल्ह्यात पसरवत वर्षभर स्पर्धेच्या माध्यमातून गोविंदा पथक एकत्र येउन सराव व्हावा कोणालाही दुखापत इजा न होता कमी थर रचून गोविंदा उत्सवाची तयारी त्यांना करता यावी यासाठी महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने पुढाकार घेतला आहे.
या माध्यमातून वर्षाभरात सर्व जिल्ह्यात गोविंदा खेळाच्या नियमानुसार ठीकठिकाणी गोविंदा स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे सचिव गीता झगडे यांनी सांगितले.
